व्हॉट्सऍप कट्टा   

पहलगाम येथील दुर्घटनेची बातमी ऐकली आणि सुमारे बारा-पंधरा वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या चलत्चित्रासारखा आठवला. 

तेव्हा मी लिहिलेल्या काश्मीर प्रवास वर्णनातील काही भाग येथे देत आहे.

सोनमर्ग, पहलगाम या दोन्ही ठिकाणी आपली वाहने नेण्याची परवानगी नाही. विशिष्ट मुक्कामापाशी पोहोचल्यावर तेथील स्थानिक टॅक्सीनेच फिरावे लागते. सर्व ठिकाणी वेटर्स, ड्रायव्हर्स, गाइड्स मुस्लिम होते; परंतु अत्यंत कष्टाळू, अदबीने बोलणारे. सगळ्यांच्या तोंडचे ‘तुम्ही आमचे पाहुणे आहात’ हे वाक्य तर मला वाटते त्यांना शिकवलेलेच असावे. अर्थात तेथील दारिद्र्य आणि पुढील चार महिन्यांसाठी बेगमी करून ठेवण्याकरिता पैसे मात्र खूप मागत होते. चंदनवाडीला पोहोचल्यावर आम्ही थेट बर्फाच्या गुहेतच पोहोचलो. अमरनाथ यात्रेसाठी इथूनच पुढे सुरूवात करावी लागते. केवळ ४०-५० कि.मी. वर, परंतु अत्यंत खडतर अशी ही यात्रा असते. तिथेच चेकपोस्ट आहे. यात्रेकरूंना रांगेत उभे राहण्यासाठी कायमस्वरूपी बॅरीकेड्स बसवलेले आहेत. या ठिकाणी मात्र अगदी एक थरारक अनुभव आला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच-साडेपाच वाजले होते. अंधार पडू लागला होता. गर्दीही अजिबात नव्हती. एक तैवानची मुलगी हिमनगांचे फोटो काढत होती. तिच्याजवळ जाऊन दोन तीन माणसे तिला काहीतरी छेडत असल्याचे आम्ही पाहिले. तिच्याही ते लक्षात आल्याने ती पटकन आमच्या ग्रुपमध्ये आली. ती एकटीच होती. एक ड्रायव्हर तिच्याबरोबर होता. आम्ही तिला मोटारीत बसवून लगेच निघून जायला सांगितले. हे पाहिल्यावर ती दोऩ/तीन माणसे आमच्यामागे येऊ लागली. ‘अरे भाई क्या चाहिये?’ असे आम्ही विचारताच ‘क्या चाहिये क्या? पैसा चाहिये, हमको गाईड बनाओ.’ असे ते म्हणू लागले. त्यापैकी एकाची नजरच एकदम बदलली. नशापाणी करणारे ‘टर्की’ मध्ये जातात तसेच वाटले. ‘भय्या, हम थक चुके है! कल सुबह आयेंगे और तुम्हारे साथही घूमेंगे! तुम्हे ही गाईड बनाके पैसा देंगे’ असे मी त्याला समजवायचा प्रयत्न केला; पण तो काही ऐकायच्या मन:स्थितीतच नव्हता. कसेबसे आम्ही मोटारीत बसून निघालो. ते तिघेजण आमच्या मोटारीच्या कॅरियरला तिन्ही बाजूंनी लोंबकाळले. ड्रायव्हरने गाडी सुरू केली तरी ते उतरले नाहीत. आमच्या हॉटेलवर त्या मोटारीची व ड्रायव्हरची नोंद असल्याने तो काही गैरकृत्य करणार नाही याची खात्री होती; पण या बाहेरच्या झोटिंगरावांचे काय? आमचा ड्रायव्हर झुबेर मात्र या प्रकाराशी परिचित असावा. ‘दीदी, डरना मत, वो अपना गाव आनेपर उतर जाऐंगे’ ड्रायव्हरने दिलासा दिला. त्या कडाक्याच्या थंडीत, बाहेर अंधार होत असताना, तो बारा किलोमीटर घाट उतरून हॉटेलवर पोहोचेपर्यंत जिवात जीव नव्हता. मनोमन रामरक्षा, भीमरूपी... सर्वांची उजळणी झाली.

कल्पना खरे

 

Related Articles